Skip to main content

शिवछत्रपती - प्रतिमा आणि वास्तव

        विष्णुगुप्त अर्थात आर्य चाणक्य। इतिहासकाळात ई. स. पूर्व ४थया शतकात भारतात जन्मलेला पहिला राष्ट्रवादी पुरुष। त्यानंतर सुमारे २००० वर्षांचा एक प्रदीर्घ शून्य काळ। दरम्यानच्या काळात थोर सम्राट, राजे, महाराजे, पराक्रमी पुरुष, अनेक थोर योद्धे या राष्ट्रात होऊन गेले। मात्र भरताकडे राष्ट्र या नजरेतून पाहणारा कोणी नाही।  ई. स. १६३० मध्य हा प्रदीर्घ शून्य काळ संपला। भारताचा भाग्यविधाता शिवनेरीवर जन्मास आला। मी इथे महाराष्ट्राचा म्हणत नाहीये हे कृपया लक्षात घ्यावे। त्यांना अज्ञानाने आम्ही महाराष्ट्राच्या सीमांमध्ये बंदिस्त केलंय।
            राजांच्या कर्तृत्वाचा विचार करताना आपण नेहमी त्यांच्या समारांगणातील पराक्रमावर विशेष भर देतो। राजे आम्हाला नेहमीच शत्रूची बोटे छाटताना किंवा त्याचा कोथळा फाडताना पाहायला आवडतात।मात्र त्यांच्या अफाट, अचाट आणि अथांग व्यक्तिमतवाचा तो फक्त एक पैलू आहे। वैयक्तिक पराक्रम पाहता असे पराक्रमी वीर थोड्याफार फरकाने सर्वत्र झालेले दिसतात। मात्र असे असूनही त्यांच्या पराक्रमाचे गोडवे राजांसारखे व राजांप्रमाणे सर्व स्तरावर गायले जात नाहीत। काय कारण असावे याचे? या प्रश्नाकडे आम्ही सहसा जात नाही। कारण तसे जाण्यात अनेक धोके असतात। सगळ्यात पहिला धोका म्हणजे मग आम्हाला इतर वीरांचेही गुणगान करावे लागेल जे सर्वसामान्य जनतेप्रमाणेच तीच्या नेत्यांनाही नको आहे, कारण त्यातून मग त्यांच्या संकुचित राजकारणाला तडा जाऊ शकतो आणि प्रांतवाद जोपासणे अवघड होऊन बसते।
          राजांनी त्यांच्या उण्यापुऱ्या 35 वर्षांच्या राजकीय  कारकिर्दीत जे अद्भुत भौतिक पराक्रमाचे प्रसंग गाजवलेत ते संख्याने ५-६ हुन जास्त नाहीयेत। त्यातील अफजल वध व शाईस्तेखाणावरील छापा सोडला तर बाकीचे प्रसंग (पन्हाळ्याहून पलायन, सुरतेची स्वारी, आग्र्याहुन पलायन) हे तसे वैयक्तिक पराक्रमाचे नसून सामूहिक पराक्रमाचे, मात्र राजांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली झालेले प्रसंग आहेत। मग असे असूनही त्यांच्या फक्त रणयोद्ध या रुपाचेच आम्हास एवढे आकर्षण का असावे? याचा सखोलपणे कधी विचार  व्हायला हवा। आपण तो करायला हवा।   वास्तविक पाहता राजांना समजावून घ्यायचे असेल तर आधी आम्ही त्यांच्यातला कल्याणकारी शासक समजावून घ्यायला हवा। योद्धा हे रूप भावणारे असले तरी सर्वसामान्यांच्या आयुष्यात परिवर्तन करण्याची ताकद ही एक कुशल शासकात असते। कुशल योद्धा हा काही क्षणाच्या पराक्रमाने एखाद्या लढाईचा निकाल बदलवू शकतो, मात्र एक द्रष्टा शासक हा आपल्या अथक व चिवट प्रयत्नांनी संपूर्ण राष्ट्राचे भाग्य बदलावतो। राजे उत्तम योद्धा होतेच मात्र ते काही जगातले एकमेवाद्वितीय योद्धा होते असे नाही। त्यांच्या समकालीनही अनेक रणधुरंदर होतेच। आधी आणि नंतरही अनेक झालेतच। मात्र संपूर्ण विश्वातून सर्वकालीन सर्वोत्तम शासक निवडण्याची वेळ येईल तेव्हा कुणासही राजांच्या उल्लेखाशिवाय ती यादी पूर्ण करता येणार नाही वा तशी हिम्मतही होणार नाही। पण मुळात स्वभावतःच रांगडे असणारे आम्ही त्यांच्या योद्धा रूपावर एवढे भाळलोय की त्यापलीकडे फारसं आम्हाला काही दिसतंच नाही।

         प्रत्येक प्रसंगांमध्ये राजांच्या अंगी असणाऱ्या  वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन होते, मात्र त्यासाठी तशी दृष्टी असणे आवश्यक आहे।  राजांनी दक्षिण दिग्विजयात असताना बाजी घोरपडे यांचे पुत्रास जे पत्र पाठविले आहे ते त्यांच्या राष्ट्रीय वृत्तीचा एक बेजोड नमुना आहे। जरी आपल्या पित्याचे वैर धरणाऱ्या बाजी घोरपडे यांना राजांनी स्वहस्ते यमसदनास धाडले असले तरी, घोरपडे हे एक पराक्रमी घराणे आहे आणि त्या पराक्रमाची राष्ट्र कार्यात मदत झाली तर सोन्याहून पिवळे, या थोर उद्देशाने राजांनी त्यांना "तुमचे गोमटे करावे ऐसें मणी आहे " असा प्रेमाचा सांगावा धाडला होता। मात्र दुर्दैवाने तेव्हाही आणि आताही त्यांची ही भावना कोणास फारशी समजलीच नाही। राजे महाराष्ट्रात जन्मले त्याचा परिणाम म्हणजे भारतवर्षात राष्ट्र या संकल्पनेच महत्व एक मराठे सोडले, तर कोणासच कधी गंभीरपणे जाणवले नाही। परिणामी परचक्र येताच स्वतःची पोळी भाजून राष्ट्राची अस्मिता दावणीला बांधायचा उद्योग आंभिकुमारापासून ते थेट मिरजाफर पर्यंत दिसतो। पुढे हाच रोग आमच्या सर्वच राजकीय पुढाऱ्याना जडला। मात्र राजांच्या नंतर मराठयांमध्ये झालेला राष्ट्र या भावनेचा प्रादुर्भाव हा अगदी 1962 ( चीन युद्ध) पर्यंत अखंडित वाहताना दिसतो। राजांच्या व्यक्तिमत्वाचा हा खरा चमत्कार आहे हे कोणी फारस विचारात घेत नाही।

राजांच्या एकूण लष्करी पद्धतीत ' साहेबी कारकुणाची' हा जो भाव सतत होता तो त्यांच्यातील उच्च दर्जाच्या शासकाचा परिपाक होता। जनतेच्या राज्यात लष्कराणे पराक्रम गाजवावा, जनतेने त्याचे तोंडभरून कौतुक करावे, मात्र सर्वोच्च सत्ता हे दिवाणी असावी अशी त्यांची धारणा होती। मात्र त्यांच्या सर्वोत्तम शासक ह्या रुपापेक्षा थोर योद्धा या रुपाचेच  सर्वसामान्य जनतेला अधिक आकर्षण असते, कारण त्यांना इतिहासच तशा पद्धतीने सांगितला जातो।  दुर्दैवाने आपल्या इथे इतिहासकार म्हणवणाऱ्या अभ्यासकांनी नाट्यमय घटनांचेच उदात्तीकरण अधिक केल्याने, सामान्यजनात तोच समज दृढमूल झाला।

         नाट्यमय घटनांच्या मसालेदार कथांमुळे लोकांमध्ये इतिहास जाणून घेण्याची उत्कंठा वाढते, हे जरी खरे असले तरी त्यात एक फार मोठा धोकाही असतो। बहुतांश वेळी फक्त आशा घटना म्हणजेच  इतिहास असा एक समज दृढ होतो। राजांची आज जणमानसात जी प्रतिमा आहे हे त्याचेच द्योतक आहे। नाट्यमय घटनेमागे असलेली उदात्त मूल्ये, त्यासाठी करण्यात आलेला त्याग, श्रम, व्युव्हरचना, त्याची पार्शवभूमी, तिच्या संभाव्य परिणामांची जाणीव, घटनेतील सहभागी पात्रांची भावना, त्यांची मनोभूमिका, त्या घटनेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन अशा अनेक घटकांचा कधी विचारही होत नाही। केवळ त्यातील नाट्यात अडकून आम्ही त्या घटनेचे ऐतेहासिक मूल्य समजून न घेता त्यातील भव्यदिव्य पराक्रम व रणांगणावरील जय पराजय एव्हढ्यापुरताच मर्यादित विचार करतो। म्हणूनच सामान्यजन आणि इतिहासकारही  'आग्रा भेट' हा राजांच्या पराक्रमचा परमोत्कर्ष मानतात। कारण त्यातील नाट्य हे सर्वोत्कृष्ट आहे। मात्र राज्याभिषेक वा दक्षिण दिग्विजय तेवढा भव्यदिव्य पराक्रम वाटत नाही कारण त्यात फक्त नाट्यमयतेला खूप कमी वाव आहे। तिथे दिर्घकाळाचे नियोजन आहे, चिकाटीने न थकता केलेला योजनांचा पाठपुरावा आहे। सामान्यांना राज्याभिषेक म्हणजे काय तर सिंहासनावर बसने, गंगोदकाने स्नान, हत्तीवरून मिरवणूक, ब्राम्हण भोजन, दक्षिणा एवढंच वाटत आणि सहसा अभ्यासक याहून अधिक काही समजावून देण्याच्या फंदात फार जात नाहीत, कारण खूपदा त्यांचीही मनोभूमिका साधारण तशीच असते। मात्र राजांच्या चतुरस्त्र राजकारणाचा काळसाध्याय असणाऱ्या दक्षिण दिग्विजयावर चरित्रकार 4 पाणे सुद्धा धड खर्च करीत नाहीत।  कदाचित भाषेची अडचण वा साधनांची कमतरता असा एखादा मुद्दा कोणी पुढे करील, तर हाच नियम आग्रा भेटीलाही लागू होतो हे सोयीस्कररित्या विसरले जाते। त्यामुळे महाराज समजावून घ्याचे असतील तर त्यांच्यातील 'रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका ' अस बजावणारा शासक आधी समजला पाहिजे।

Comments

Popular posts from this blog

महाराजांचे मनोगत

🚩🚩महाराजांचे मनोगत🚩🚩 या महाराष्ट्रात आता जीव रमत नाही। माझ्या मुलखताच मला आता मावळा भेटत नाही।। दर जयंतीला नवी संघटना उगवते। यांच्या हट्टासाठी मला वर्षातून तीनदा जन्मवे लागते। एवढे करूनही माझी विटंबना काही टळत नाही। या महाराष्ट्रात.... माझे बाजी, तानाजी स्वराज्यासाठी लढले। आताचे बाजी, तानाजी खुर्चीसाठी लढतात। सत्तेसाठी काहीही, हा मंत्र जो तो पाळी। या महाराष्ट्रात ... हे राज्य व्हावे ही तो श्रींचीच इच्छा होती। स्वराज्यासाठी प्राण देण्याची शर्यतच जणू होती। स्वराज्यापुढे मावळ्यांना माझ्या घरदारही दिसले नाही। या महाराष्ट्रात ... सला काय निमित्ते केला? या एका बोलासाठी सरनोबत खर्ची पडले। संताजी धनाजीला मुघल पाण्यातही पाही। या महाराष्ट्रात ... मुघल मनसब, आदिली वतने। मावळ्यांना माझ्या कशाचीच अपूर्वाई नव्हती। लढले सगळे घडविण्या समर्थ शिवशाही। या महाराष्ट्रात ... रोजच होतो आता माझ्या नावाचा जयघोष। डॉल्बीच्या भिंतींपुढे चाले धुडगूस। माझ्या बसल्या तरी, यांच्या कानठाळ्या बसत नाही। या महाराष्ट्रात ... वाटते आता सुखे कैलासातच राहावे। रोजच आपुले मरण किती वेळा प...